राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्याकडे दिला असल्याची माहिती शआलेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. येत्या सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु करण्यात याव्यात, असे या प्रस्तावात म्हटले आहे. मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय लवकरच घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून त्याचा प्रभावही कमी झाला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी विविध घटकांकडून होत आहे.
कोरोना नियमांचे पालन करुन राज्यातील शाळा सुरू कराव्यात, त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील विविध समाजघटकांतून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी सातत्याने मागणी होत होती. त्यावर विचार करुन तशा प्रकारचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या विषयावर मंगळवारी राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सची एक बैठक झाली असून टास्क फोर्सचे सदस्यही राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत.